🌹🌹चित्रपट गप्पा🌹🌹

 

                 चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रसिध्द असलेला दाक्षिणात्य नट कमल हासन याचे मोजकेच हिंदी व तमिळ चित्रपट मला बघायला मिळाले. त्यापैकी एक दुजे के लिये, हिंदुस्तानी, सदमा, हे चित्रपट विशेष लक्षात राहिलेत.

                 कमल हासन आणि श्रीदेवी यांची प्रमूख भूमिका असणारा ‘सदमा’ हा हिंदी चित्रपट मुंद्रम पिरई या मूळ तमिळ चित्रपटावरून निर्मिलेला सुंदर पण प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा चित्रपट आहे.

                 आपण त्याविषयी अधिक बोलू……….


🌹सदमा(१९८३)🌹

दिग्दर्शन – बाळू महेंद्र, संगीत – इलिया राजा,

प्रमुख कलावंत – कमल हासन, श्रीदेवी, अरविंद देशपांडे व पेंटल.

                       ‘सदमा’ची कहाणी सोमू व नेहालता या दोन पात्रांभोवती फिरते. चित्रपटाचा नायक सोमु हा शिक्षकी पेशातला तरूण आहे. एकदा त्याचा रंगेल दोस्त त्याला वेश्यागृहात घेऊन जातो. तेथे एकांतात सोनूला नेहालता ही भाबडी, परंतु फसली गेलेली तरूणी भेटते. तीची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. हे लगेच सोमुच्या लक्षात येते. तो नेहालताला बोलते करायचा प्रयत्न करतो. तेव्हा ती भडकते. सोमूला ती पेला फेकून मारते. त्याला जखम होते. ती जखम पाहून नेहालता घाबरते. मग सोमू तीला शांत करतो.

                      सोमूला तीची दया येते. या लोकांच्या तावडीतून तीला सोडवावे असे ठरवून तो पुन्हा तेथे येतो. नेहालताला भेटतो. विश्वासात घेतो. तीची माहिती विचारून घेतो.

                      नेहालता शहरातील एका चांगल्या, सधन कुटुंबातली तरूण मुलगी असते. एका कार अपघातामध्ये ती सापडते. त्या घटनेत मेंदूला बसलेल्या जबर धक्क्यामुळे स्वतःचे पूर्वीचे आयुष्य ती विसरलीय. हॉस्पिटलमध्ये तीला आईवडील उपचारांसाठी ठेवतात. तेथे त्यांची ताटातूट होते. हॉस्पिटलमध्ये एक लबाड माणूस नेहालताला फसवून पळवतो व वेश्यागृहात नेऊन विकतो.

                      नेहालताकडून तुटक माहिती मिळाल्यावर दोस्ताच्या मदतीने सोमू तीला सोडविण्याचे प्रयत्न सुरू करतो. प्रसंगी पैसे देऊन वेश्यागृहातुन तीला सोडवतो. स्वतःच्या घरी आणतो. लहान मुलासारखी नेहालताची सेवा करतो. तीची वेणीफणीही करतो ! सोमू तीला फार जपतो.

                      हळू हळू नेहालता माणसात येते. मात्र तीची बालबुध्दी अजून गेलेली नाही. त्याचा गैरफायदा गावातला एक लोहार घेतो. तो तिच्यावर पाळत ठेऊन तीला गोड बोलून एकदा एकांत ठिकाणी नेतो. बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. ती घाबरते. पण त्याच्याशी झटापट करुन कशीबशी सुटका करून घेते व तेथून सटकते. सोमूला हे नंतर समजते. तो भयंकर संतापतो. मग विलक्षण हाणामारी होते.

                     त्यानंतर एकदा ओळखीची बाई सोमूला सांगते, ‘जवळच्या गावात बाबा आलाय. त्याचेकडे नेहालताला घेऊन जा. उपचार झाले तर ही बरी होईल.’ सोमू ते करायला निघतो. हा प्रयत्न यशस्वी होतो ! नेहालताची गेलेली स्मृती परत येते.

                     दरम्यान, शहरात राहणाऱ्या नेहालताच्या आईवडिलांना तीचा पत्ता लागतो. ते पोलिसांना घेऊन सोमूच्या गावात येतात. घर शोधुन तीला गाठतात. तेव्हा सोमू नसतो. नेहालता घरात झोपलेली असते. जाग आल्यावर तीच्या डोळ्यापुढे स्वतःचे आईवडिल दिसतात ! ती त्यांना ओळखते व बोलू लागते.

                     पोलिस सोमूचा शोध घेतात. तो भांबावून जातो. त्यांच्यापासून दूर राहतो. मग सगळे निघून जातात. नेहालताला आईवडील शहरात आपल्या घरी नेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येतात.

                      सोमू बरीच पायपीट करून रेल्वे स्टेशनवर दाखल होतो. त्या धावपळीत त्याला लागते, तरी तो नेहालताला शोधून काढतो. डब्याजवळ जाऊन खिडकीपाशी बसलेल्या नेहालताला हाका मारतो. ओळखीच्या खाणाखुणा करतो. तीला कुतूहल वाटते ! ती सोमूला ओळखत नाही ! सोमू चक्रावून जातो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून तीला खुणावतो. पण काहीच उपयोग होत नाही.

                      गाडी हळू हळू निघून जाते. हा धक्का त्याला सहन होत नाही. तो वेड्यासारख्या खाणाखुणा करू लागतो. त्याच विमनस्क स्थितीत एका बाकड्यावर बसतो. हाच चित्रपटाचा शेवट आहे.

                      ‘सदमा’तील कमल हासनच्या भूमिकेबद्दल वादच नाही. याशिवाय, श्रीदेवीचा भाबडा अभिनय अस्सल झालाय. या चित्रपटात इलिया राजा यांनी संगीतबद्द केलेली गाणी श्रवणीय आहेत. सोमूने नायिकेला शांत झोप यावी म्हणुन म्हटलेली लोरी(अंगाई गीत) छान जमलीय.

                      चांगली कथा, अस्सल अभिनय, कुशल दिग्दर्शन व श्रवणीय संगीत या साऱ्यांमुळे ‘सदमा’ अजूनही लक्षात राहिलाय.

                            ::::::::::::::::::::::::::::::::


Comments

Popular posts from this blog

💐💐वाचन छंद💐💐

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

💐💐चित्रपट गप्पा💐💐