Saturday 3 February 2024

💐💐आठवणीतील व्याख्याने💐💐

            स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या महिन्यात तारखेला आहे. या दिवशी

 किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत दर वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होईल.  

                 शिवजयंतीच्या निमित्ताने या थोर विभूतीचे स्मरण करताना मला एक विशेष व्याख्यान आज आठवते आहे. शत्रू विरुध्द युद्धनिती आखताना शिवाजी महाराजांनी किती धुरंदरपणा दाखवला होता, याचे चांगले उदाहरण या व्याख्यानात ऐकायला मिळते……….  

    

💐शिवजयंती व्याख्यान💐

                 शिवजयंतीच्या कार्यालयीन कार्यक्रमात एकदा  व्यासंगी व्याख्याते व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिष्य श्री. गणेशराव धाळपे आले होते. त्यांनी शिवकाळातील कितीतरी घटना श्रोत्यांना ऐकवल्या. त्यापैकीच ही एक घटना आहे.               

                 शिवराज्याभिषेकाच्या काही दिवस अगोदर स्वराज्यात सारे काही सुरळीत चालू असताना कपटी  औरंगजेबाने त्याच्या पराक्रमी पण अल्पबुध्दीच्या सरदाराला म्हणजेच किल्लेदार कुतुबखानाला आदेश दिला की     कोणत्याही परिस्थितीत शिवाजीचे सारे राज्य खातमा करण्याची हालचाल सुरू कर.

                 आपल्या सुलतानाचे हे म्हणणे प्रत्यक्षात किती अवघड आहे याची कुतुबखानाला कल्पना होती. पण तो हुशारीने वागला. त्याने आधी सोन्याचे ताट भरून सुलतानाला(औरंगजेब) खुश करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो दिल्लीला औरंगजेबाकडे निघणार होता.

                  ही खबर महाराजांच्या गुप्तहेरांनी मिळवली. हा बहुमोली खजिना केंजळगडावर ठेवला होता. केंजळगड(म्हणजेच कुतुबगड) हा भोर तालुक्यातील कारी-आंबवडे जवळचा ऐतिहासिक दुर्ग. या किल्ल्याच्या रक्षणार्थ जवळपास चाळीस हजाराचे सैन्य सदैव तैनात असायचे.

                 राजांनी बुद्दी चालवून गनिमी कावा आखला व सेनापती हंबीररावांच्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी सुरु केली.

                 सेनापती हंबीररावांनी डोके चालविले. एकूण नऊ हजार सैन्य मराठ्यांकडे तर चाळीस हजारहुन अधिक सैन्य कुतुबखानाकडे होते. नैसर्गिक जंगल, पाणी आणि डोंगरांनी वेढलेल्या केंजळगड किल्ल्याचे भीमा नदीमुळे दोन भाग झाले होते. त्याचा फायदा घेऊन किल्ल्यावरील हल्ल्यासाठी फक्त दोन हजार तर दूरवर नदीच्या मोठ्या पात्रा पलीकडे लपून ठेवलेले सात हजार सैन्य, असा बेत ठरला.

                 त्याप्रमाणे छोटी दोन हजाराची तुकडी भर दुपारी प्रखर उन्हात किल्ल्यावर चढाईच्या तयारीला लागली. म्हणजे प्रत्यक्ष चढाई नव्हे तर दूरवरून बंदुकीच्या फैरी झाडणे. त्यासाठी  एकमेकांच्यात मोठे अंतर ठेवले. हे विखुरलेले सैन्य खूप मोठे असावे व एवढ्या दुपारी हल्ला होतोय म्हणजे शत्रू मोठ्या संख्येने येतोय, असा अंदाज कुतुबखानाच्या सैन्याला यावा असा सेनापतींचा हेतू होता.

                 पुढे तसेच घडले.  भर दुपारी घोड्यावरून स्वार  टापा टाकीत निघाले. एकमेकांत जास्त अंतर असल्याने सर्वदूर धुळीचा लोट उठला. किल्ल्यावरील पहारेकरी सैन्याने मराठ्यांचे मोठे सैन्य हल्ला करायला येतेय असा अंदाज  लावला.

                 कुतुबखानाला ही खबर मिळाल्यावर ताबडतोब त्याने सैन्यास खाली प्रतिकारासाठी कूच करण्याचा हुकूम दिला. शस्त्रसज्ज होऊन कुतुबखानाचे सैनिक खाली निघाले.

                 इकडे राजांचे सैन्य वरून आलेल्या सैन्याला चेतवत घाबरल्याचे नाटक करून उलटे माघारी फिरू लागले ! जोरदार पाठलाग सुरु झाला. मूठभर सैन्य पुढे आजूबाजूस पांगले व लपून राहिले. खानाचे सैन्य खुश झाले !आता कशाला पाठलाग करायचा ? परत फिरा…’ असा सेनापतीचा हुकूम झाला आणि खानाचे सैन्य परत फिरले.

                याच दरम्यान मराठ्यांचे लपलेले, पळालेले सैन्य परत किल्ल्याच्या दिशेने धूम ठोकत निघाले.

किल्ल्यावर पुन्हा मराठ्यांचे सैन्य हल्ला करण्यास आलेले पाहून खानाचे सैन्य गोंधळले ! त्यांना हुकूम झाला की पुन्हा त्यांना पिटाळून लावा. त्यांना किल्ल्यापासून दूरवर न्या’.

               पुन्हा जोरदार पाठलाग सुरू झाला. धूम ठोकत मराठी सैन्य

परत फिरले ! आता पार दूरवर खानाची बहुतेक   फौज आली होती.

               महाराजांच्या रणनीतीनुसार किल्ल्याजवळ लढाईसाठी राखून ठेवलेले सात हजार मावळे जोरदार हल्ल्याच्या इराद्याने चढाई करू लागले. त्यांना आता त्यांना किल्ल्यावर खानाचे लढाऊ सैन्य मिळणार नव्हते. जनानखान्यातला बायका-दासी वर्ग, वृद्द नोकरदार, अशी निशस्त्र माणसेच किल्ल्यात होती. शिवाय तेथे ठेवलेला बहुमोली  खजिना विनासायास लुटायला मिळाला, घोडेही मिळाले. त्याच घोड्यांवरून मोठी लूट टाकून मराठी सैन्य स्वराज्यात दाखल झाले.

              अखेरीस खानाला लक्षात आले की आपण फसवले गेलोय ! मात्र आता इलाज नव्हता. कुतुबखान खाऊ की गिळू करू लागला. आता औरंगजेबाला सामोरे जावे कसे ?, याचा तो विचार करू लागला. औरंगजेबास या सर्व घटनांची खबर मिळाली तेव्हा  तो कुतुबखानावर खवळला.

             औरंगजेबास शांत करण्याचा आता एकच मार्ग खानाकडे उरला होता. त्याला भरपूर पैसा आणि सोने-नाणे देऊन काही काळापुरते तरी शांत करायचे. त्याने औरंगजेबाला माफीचे समजावणीचे पत्र धाडले. भरपुर खजिनाही नजर करायला येतो असे कळविले. शिवाय, आता मी त्या शिवाजीला तुमच्या पायाशीच आणून हजर करतो असे वचन दिले. औरंगजेब यावर शांत झाला.

             खजिना दिल्लीला नेण्याची खबर गुप्तहेरांमार्फत राजांना कळली, मग व्यवस्थित पाळत ठेऊन मराठी सैन्याने त्या खजिन्याचीदेखील लूट केली. यामुळे कुतुब खान खच्ची झाला.  काय करू अन् काय नको असे त्याला झाले.

             दरम्यान महाराजांचा धूर्त वकील कुतुबखानाच्या दरबारात दाखल झाला.  अगदी अजिजी करून वकिलाने महाराजांच्या वतीने खानाची माफी मागितली आणि सांगितले, आमच्यापासून ही मोठी चूक झालीय. हे घडायला नको होते. त्यामुळे महाराजांना आपली बिनशर्त माफी मागायची आहे. एवढेच नव्हे तर काही सोने नाणे, यांसह स्वराज्यातले सतरा किल्ले द्यायला महाराज तयार आहेत. स्वतः महाराज युवराज संभाजीराजे आपले सुलतान औरंगजेब यांची भेट घेण्यास राजीखुशी तयार झालेत. त्यासाठी  आलमगीर औरंगजेबाच्या स्वाक्षरीचे सीलचे शाही फर्मान आम्हाला मिळावे.

            कुतुब खान एकदम निवळला ! मनात तो खुष झाला. काही करता एवढे सारे मिळणार ! याचे श्रेय आपण घ्यायचेच, असे त्याने ठरवले. शिवाजी  महाराजांना आवश्यक असणारे शाही फर्मान खानाने औरंगजेबाकडून  मिळवले.

           मात्र यात जवळपास तीन  महिन्यांचा वेळ गेला. तीही महाराजांची चाल ! कारण हे फर्मान पूर्वी वाहतुकीचे मार्ग सोपे नसल्याने लगेच होणार नव्हते. तेवढा वेळ राजांना आपल्या सैन्याची तयारी करण्यासाठी मिळाला.

          शाही फर्मान घेऊन कुतुबखानाचा वकील राजांच्या दरबारी रायगडावर आला.  तेथे भलताच प्रसंग घडला ! राजांनी शाही फर्मान वाचले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी कडक भाषेत खानाच्या वकिलाला सुनावले. खलिता भिरकावला ! ‘असे होऊच शकत नाही’, असे महाराज म्हणाले.    

          खानाचा वकील हादरून गेला. परत आल्यावर त्याने सगळी हकीकत कुतुबखानाला सांगितली. कुतुबखानाची पाचावर धारण बसली ! मग औरंगजेबाने  खानास सोडले नाही. शिक्षा म्हणून दुर काबुल कंदाहारकडे बदलीचा हुकूम काढूनकुतुबखानास पाठविले, तेव्हा औरंगजेब शांत झाला.

          तर अशी ही शिवरायांच्या युद्धनितीची कहाणी श्रोत्यांना नाट्यमय भाषेत रंगवून सांगणाऱ्या गणेशराव धाळपे यांचे व्याख्यान अजूनही माझ्या स्मरणात राहिलेय.

 

              || छत्रपती शिवाजी महाराज की जय ||

 

                                                            :::::::::::::::::::::::   

No comments:

Post a Comment