💐💐थिएटरमध्ये💐💐

             मराठी नाटक थिएटरमध्ये पाहण्यात प्रत्येक रसिकाला विशेष आनंद मिळतो. आपली नाट्यकला प्रत्यक्ष रसिकांसमोर सादर करणाऱ्या कलावंतांचा अभिनय, त्यांची देहबोली, संवादाची फेक, हे सारे प्रेक्षकाला नाटकाच्या कथानकात समरस करतात. तो त्या सादरीकरणाला मनःपूर्वक दादही देत असतो. कलावंतांना देखील त्यात आगळे समाधान प्रेरणा मिळते.

              एक नाट्यरसिक म्हणून ही अनुभूती घेण्याचा प्रयत्न करताना मला कितीतरी चांगली मराठी नाटके बघायला मिळाली. त्यापैकी गेला माधव कुणीकडे आणि सुंदर मी होणारही दोन नाटके आहेत.

              चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यगृह  उद्घाटन सोहोळ्याच्या निमीत्ताने ही नाटके सादर झाली होती. वसंत सबनीस या सदाबहार नाटककाराचे  एक नाटक होते, तर दुसरे विख्यात अष्टपैलू साहित्यिक पु.. देशपांडे यांनी लिहिलेले होते.

              माझ्या दृष्टीस ही दोन्ही नाटके कशी भावली ते थोडक्यात इथे देत आहे………

 

💐💐गेला माधव कुणीकडे ?💐💐

*लेखन - वसंत सबनीस

*भूमिका प्रशांत दामले, विनय येडेकर  व इतर.

       

               दोन बायकांशी लग्न करून आळीपाळीने एकेकीशी संसार करणारा एक चतुर नवरा या नाटकाचा नायक आहे ! या चतुर नवऱ्याची एका घटनेतून झालेली फजिती आपण नाटकात बघतो. तो आपल्या दोन बायकांना चक्क फसवतोय ! त्याला अपत्यप्राप्तीही होते. मात्र काही दिवस अगोदर त्याचा एक प्रामाणिक मित्र त्याचे बिंग फोडतो. त्याकरीता दोघी बायका एक होऊन नायकाला चांगलाच धडा शिकवतात, अर्थात संसार मोडता !

               वास्तविक हा विषय गंभीर आहे. पण हास्यकारक घटना आणि नाट्यमय प्रसंग नाटकात सातत्याने येत असल्याने प्रेक्षक सुखावतात.

               या नाटकातील सर्व  कलावंतांनी छान कामे केली आहेत. विनय येडेकर  प्रशांत दामलेची जुगलबंदी चांगली रंगत आणते. वसंत सबनीसांचे संवाद  नेहेमीप्रमाणेच खुसखुशीत आहेत.  वसंत सबनीस यांनी लिहिलेली इच्छा माझी पुरी करा आणि सौजन्याची ऐसी तैसी ही गाजलेली नाटके आहेत.

 

💐💐सुंदर मी होणार💐💐

 

*लेखन - पु. . देशपांडे

*भूमिका-डॉ. श्रीराम लागू, गिरीश ओक, ज्ञानेश पेंढारकर व इतर.

                 हे कौटुंबिक नाटक आहे. एक श्रीमंत जहागीरदार आपल्या मुलांना देत असलेली सापत्न वागणूक त्यांच्या स्वातंत्र्यावर आलेली गदा  यांतून निर्माण झालेले पेच आपण नाटकात पाहतो. या परिस्थितीत मुलांची तसेच त्यांच्या फॅमिलीशी संबंध असलेल्या डॉक्टरची होणारी परवड, याचे भाष्य मिश्किल व विनोदी अंगाने  प्रेक्षकांसमोर सादर झाले आहे.             

                 नाटकात डॉ. श्रीराम लागू यांनी चांगली भूमिका केलीय. मात्र या नाटकात त्यांना विशेष वाव नाही. गिरीश ओक या गुणी नटाने छोटेसेच पण छान काम केलेय. ‘सुंदर मी होणारमध्ये विशेष लक्षात राहीला तो ज्ञानेश पेंढारकर हा कलावंत. गोड गळा असलेल्या  व शास्त्रीय अंगाने नाट्यपदे गात अभिनय करणाऱ्या या उमद्या नटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवून पुलंचे नाटक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेय.

 

 

                                          ---------------------

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

💐💐वाचन छंद💐💐

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

💐💐चित्रपट गप्पा💐💐