Thursday, 11 May 2023

💐💐हिमयात्रा💐💐

               जगात सर्वोच्च स्थानी असणारे ' एव्हरेस्ट ' हिमशिखर(उंची २९,०२८ फूट) आयुष्यात एकदा तरी सर करावे, असे प्रत्येक साहसी गिर्यारोहकाचे स्वप्न असते. विविध मोहिमांद्वारे जगभरातील गिर्यारोहक  हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. काहींना त्यात यश मिळते, काहींना अपयश. कित्येकांना आपले  प्राणदेखील गमवावे लागतात या उत्तुंग एव्हरेस्टसाठी !

                   स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा एव्हरेस्ट प्रवास अखंडितपणे सुरू आहे अन् यापुढेही सुरू राहील.

                   महाराष्ट्रातील साहसी गिर्यारोहकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प पंचवीस वर्षांपूर्वी केला होता. तो संकल्प पूर्ण केला १९९८ मध्ये. तो दिवस होता १८ मे !

                   या महत्त्वाकांक्षी नागरी गिर्यारोहण मोहिमेचा कर्तृत्ववान नेता होता ऋषिकेश यादव. त्याच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या टीममधील, एव्हरेस्टवर प्रथम पाऊल ठेवणारा तरुण गिर्यारोहक होता सुरेंद्र चव्हाण ! या टीममध्ये पराग सहस्त्रबुध्दे, मुकेश मैशेरी, अभिजित बर्मन, नरेंद्र केणी, मोरेश्वर कुलकर्णी, राजेश पताडे, डॉ. युवराज चव्हाण, जयवंत तहसिलदार, लवराज  धरमसक्तू आणि इतर साहसवीरांचा देखील समावेश होता.

                  पंचवीस वर्षांपूर्वी विविध संस्थांचे अनुभवी गिर्यारोहक एकत्र कसे आले, त्यांनी कशी पूर्वतयारी केली, किती अडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आणि त्यातून पुढे होऊन सारे यशस्वी कसे झाले, हा एका ग्रंथाचा विषय होईल.

                   मात्र त्यावेळची परिस्थिती तुम्हांपुढे ठेवणे मला आज महत्वाचे वाटतेय. म्हणून अगदी थोडक्या शब्दांत काही आठवणी इथे सांगत आहे……......

               

💐पानबाजार सोसायटी ते एव्हरेस्ट💐

             १९९५-९६ नंतरचा तो काळ असावा. गिरीदुर्गात मनसोक्त भटकंती करणारे साहसप्रेमी त्यांच्या संस्था त्यावेळी भरपूर होत्या, मात्र त्या विखुरलेल्या स्वरुपात होत्या. त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने. सह्याद्रीतील गिर्यारोहक शिवभक्त साबीरभाई शेख यांनी या कामी पुढाकार घेतला. समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  साबीरभाईंचा लोकसंपर्क चांगला होता. त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील विविध संस्थांचे गिर्यारोहक एकत्र आले महासंघ स्थापन झाला.

                   मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या महासंघाच्या उपक्रमांतर्गत, आपल्या राज्यातील साहसवीरांचे पाऊल जगातल्या सर्वात उंच शिखरावर उमटावे, या हेतूने एव्हरेस्ट शिखर मोहिम आयोजित करण्याविषयी विचारमंथन सुरू झाले. शरद ओवळेकर, भीष्मराज बाम अशा दिग्गजांचे मार्गदर्शन घेण्यात येत होते. हृषिकेश यादव, चारुहास जोशी, उदय कोळवणकर, विजया गद्रे, डॉ. मिलिंद चितळे, चारुहास जोशी, विद्याधर जोशी, मुकेश मैशेरी,  या अनुभवी गिर्यारोहकांच्या संपर्कबैठका सुरू झाल्या. हळूहळू इतरजण त्यांत सहभागी होऊ लागले.

                      मात्र हा खर्चिक  प्रोजेक्ट होता. पैशाची जमवाजमव करताना सगळ्यांना एनर्जी घालवावी लागणार होती.  त्यामुळे पुढे व्हायचे की नाही ? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला. अर्थात, एकदा पाऊल पुढे टाकले तर जिद्दीने मोहिम फत्ते करण्याची नैतिक जबाबदारी सर्वांवर येणार होती.

                     अखेर, पूर्ण विचारांती एका बैठकीत शिक्कामोर्तब होऊन 'एव्हरेस्ट गिर्यारोहण मोहिम ९७' जाहीर करण्यात  आली

                     मुंबईतील पूर्व उपनगरात सायन सर्कलच्या पुढे हायवेवर एव्हराड नगर नावाची वसाहत आहे. तेथे मुंबईतील पानबाजार व्यापाऱ्यांची एक हाऊसिंग सोसायटी वसलेली आहे. मी पहिल्यांदा तेथे एक मिटिंग अटेंड केली.  गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी हजर होती. या लोकांत आपण कसे काय सामावून जाऊ ? हा प्रश्न मनात ठेवत मी त्यांच्यात सहभागी झालो.

                     एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून या मोहिमेत जमेल तसे कार्यरत राहू, फिल्डवर नव्हे तर मुंबईत राहून आपल्याला काही काम करता येईल आपला अनुभवही वाढेल, या भावना मनी ठेवून मी त्यांच्यात सहभागी झालो.

                      नियमित बैठकांमधील उपस्थिती हळूहळू वाढू लागली.  मुंबईच्या बाहेरील कितीतरी संस्था इच्छुक गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेत सामील होऊन सक्रिय झाले होते. प्रत्येक बैठकीत एव्हरेस्ट मोहिमेचे प्राथमिक  नियोजन करण्याच्या कल्पना जुने नवे सहकारी मांडत होते. त्यातील नावीन्य त्रुटी यावर स्पष्टपणे मते मांडली जात होती. अनुभवी मंडळी त्यावर अंतिम निर्णय घेत होती.

                      माटुंग्याचे मथुरा भवन, गिरगावातील . का. पाटील  उद्यान, ठाण्यातील वकील श्रीकांत ओकचे घर, सिव्हिल हॉस्पिटलजवळचे मीनल चिलईकरचे घर, काका जोशींचे मुलुंडचे घर, दादरला फडके सरांचे ऑफिस, ही  मिटिंगची हक्काची ठिकाणे होती. कधीमधी दादर येथील बालमोहन विद्यालयाचे वर्गही उपलब्ध होत होते.    

                      भीष्मराज बाम सर, डॉ.मिलिंद चितळे डॉ. नितीन पाटणकर या मान्यवरांनी सहभागी सदस्यांची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी  विशेष सराव शिबिरे घेण्यास सुरुवात केली.

                      या  मोहिमेस आर्थिक मदत मिळविण्यासाठी लहानथोर गिरिप्रेमी मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. कॉर्पोरेट कंपन्या, खासगी उद्योजक आणि सरकार यांजकडून संमिश्र प्रतिसाद मिळत होता.  काही दानशूर व्यक्ती   स्वतःहून पुढे होऊन मोहिमवीरांना प्रोत्साहित करीत होत्या. आवश्यक अन्नधान्य गिर्यारोहण साधन सामुग्री, वैद्यकीय साधने औषधे, संपर्क वायरलेस सेट्स, उंचावरील हवामानात टिकणारे तयार खाद्यपदार्थ, प्राणवायू नळकांडी, पोषाख- जॅकेट्स, बुट्स, इत्यादी रुपातही काही मदत काही होती.

                        पैशाचे गणित सहजासहजी सुटत नव्हतं. मग मोहिम मार्ग बदल करणे, टीम मेंबर्सची संख्या कमी करणे, जाहिरात करणे, अशा तडजोडी मोहिम प्रमुखांना कराव्या लागल्या आणि मोहिमेचे नामकरण ' टाटा एव्हरेस्ट इंडिया ९८ ' असे झाले.

                         १९९६ साली सुरू झालेल्या मोहिमेच्या या वाटचालीला  अखेर यश मिळाले ते १८ मे १९९८ रोजी ! चीनमधील उत्तर बाजूकडून सुरेंद्र चव्हाण या मराठमोळ्या तरुणाने पहिले पाऊल एव्हरेस्टवर  ठेवले आणि सर्वांच्या अथक  परिश्रमाचे सार्थक झाले ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा झाला. शासनाने या विक्रमी मोहिमेची विशेष  दखल घेतली. शानदार गौरव सोहोळा साजरा केला !                  

                         याच जल्लोषात यंदा पंचविसावा गौरव सोहोळा १८ मे २०२३ रोजी साजरा व्हावा नवीन तरुणपिढीला त्यातून चांगली प्रेरणा मिळावी, अशी सदिच्छा  इथे व्यक्त करताना गिर्यारोहण क्षेत्रात आज स्थिती किती बदलली  आहे, याबद्दल सांगणे मला महत्त्वाचे वाटते.

                        महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रात बरेच चांगले बदल झाले आहेत. तरुण वर्गाची भटकंती खूप वाढलीय. एव्हरेस्टच नाही, तर इतर कितीतरी हिमशिखरे यशस्वीरित्या सर केली जात आहेत. शिखरचढाईचे नवनवे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विक्रम होऊ लागलेत, सह्याद्री तसेच हिमालयाचा परिसर पर्यटकांना आता खुणावू लागलाय.

                         मात्र  याची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवीय. वाढत्या गर्दीमुळे हिमालयात, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांमध्ये,  आणि ऐतिहासिक गडदुर्गांवरील निर्मळ-शांत निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. हौशी पर्यटकांची संख्या वाढलीय. या क्षेत्रात धंदेवाईकपणा आलाय.या लोकांकडून निसर्गातील धोके दुर्लक्षिले जात आहेत. जीवघेण्या अपघातांचे प्रमाण त्यामुळे वाढते आहे.

                         वास्तविक, गिर्यारोहण हा निव्वळ छंद नाही, तर तो एक साहसी क्रीडाप्रकार आहे. गिरीशिखर, कडे, प्रश्तर-भिंत, दुर्गम दुर्ग चढता उतरताना आपल्या, तसेच इतरांच्या जीवाची सुरक्षा अत्यंत  महत्वाची असते. यात दक्ष राहुन गिर्यारोहणाचा अनुभव वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण संस्था अभ्यासक्रम राबवत आहेत. त्याचा लाभ नवख्या गिर्यारोहकांनी अवश्य घ्यायला हवा.         

                         असो, एव्हरेस्ट मोहिमेत एक सहभागी कार्यकर्ता म्हणून काम करताना मला खूप काही शिकायला मिळालंय. गिर्यारोहण मोहिमेची पूर्व तयारी कशी करावी याचे शिस्तबध्द नियोजन, अवघड गिर्यारोहणाचा सराव, मॅनपॉवरचे महत्व, खर्चाचा भार त्याची तरतूद, दात्यांचा जाणत्या राजकारण्यांचा शोधसंपर्क, मोहिमेस आवश्यक साहित्य सामुग्री, पात्र गिर्यारोहकांची निवड पद्दत, पूर्ण टीमचे स्पिरीट कसे ठेवावे, या साऱ्याचा सक्रिय अनुभव मिळणे,  हे माझ्या दृष्टीने विलक्षण  होते.

                          याशिवाय, मेन टीममेम्बर्सबरोबर मला थोडीफार भटकंती सराव करायला मिळाला, जुन्या जाणत्या गिर्यारोहकांशी छान मैत्री झाली, मनमोकळ्या गप्पाटप्पा मारताना काहींचे स्वभाव दोषसुध्दा न्याहाळता आले.  हे सारे मला उपयोगी ठरणारे होते.

                          आज पंचवीस वर्षांनंतर या उत्तुंग यशाचा आनंद मला जरूर आहे. पण याप्रसंगी काहीजणांचे स्मरणही होत आहे. ते आज हयात नाहीत. नेहेमी हसतमुख असणारा पराग सहस्त्रबुध्दे, विलक्षण टीम स्पिरीट असलेला मुकेश मैशेरी, साऱ्या मोहिम परिवारास कर्तव्यबुद्दीने मार्गदर्शन करणारे ओवळेकर बाम सर. या व्यक्ती कायम स्मरणात राहतील.

 

                                                   :::::::::::::::::::::::::::

 


No comments:

Post a Comment