Monday, 2 January 2023

💐💐स्वर्गस्थ💐💐

           नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद बातमी ऐकायला मिळाली. सिनेपत्रकार, चित्रपट सोसायटीच्या चळवळीत अग्रस्थानी असणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक-अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

               प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील सर्वात जुन्या सिने सोसायटीची स्थापना करण्यात नांदगावकर यांचा पुढाकार होता. आपण प्रभात संस्थेशी चित्रपट पाहण्याच्या छंदापायी जोडले गेलो आपल्या प्रेक्षक नजरेत आमूलाग्र बदल झाला. कितीतरी देशी विदेशी चित्रपट प्रभातमुळेच बघायला मिळाले आणि नांदगावकरांमुळे आपली प्रभातशी ओढ टिकून राहिली.

               जुन्या जाणत्या संस्थेतील या निष्ठावंत व्यक्तीला माझी आदरांजली म्हणून हा शब्दसंवाद करीत आहे…..……..

💐चित्रपट रसिक चळवळीचे निष्ठावंत कलाकर्मी : सुधीर नांदगावकर💐

               प्रभात म्हटले की सुधीर नांदगावकर आणि सुधीर नांदगावकर म्हटले की प्रभात अशी दोघांत फिट्ट मैत्री होती. मुंबईतच नव्हे तर पुऱ्या देशातील चित्रपटप्रेमींनी डोळे उघडे ठेवून अभ्यासू वृत्तीने चित्रपट पहावा, कारण तो फक्त मनोरंजन म्हणून पाहण्याची गोष्ट नाही, ते प्रभावी कलामाध्यम आहे आपण चित्रपटाचा आस्वाद घेता घेता त्याचा अभ्यास करू शकतो, हे आपल्या भाषणातून, संवादातून, सिने सोसायट्यांची चळवळ उभारून नांदगावकरांनी दाखवून दिलेय.

               सिने चळवळीत नांदगावकरांसह वसंत साठे, सत्यजित रे, अमोल पालेकर, अरुण खोपकर, दिनकर गांगल, अशोक राणे, अशी अगणित मान्यवर मंडळी प्रारंभीपासून कार्यरत होती. मामी फिल्म फेस्टिव्हल, एशियन फिल्म फेस्टिव्हल, जागतिक, तसेच राष्ट्रीय   राज्य पातळीवर आज होत असलेले चित्रपट महोत्सव हे या साऱ्यांच्या परिश्रमांचे फळ आहे. लघुपट, माहितीपट यांच्या महोत्सवांचीदेखील आज सर्वत्र दखल घेतली जातेय. त्यासाठी तळमळीने कार्य करणारांत आमचे सुधीर नांदगावकर अग्रणी होते.

              चौफेर व्यक्तिमत्त्व लाभलेले नांदगावकर पत्रकारिता, पुस्तक लेखन, चित्रपटांचे परीक्षण, महोत्सवांचे आयोजन, ज्युरी, सरकारी निवड समित्या, यांमध्ये नेहेमी मग्न असायचे. हे सारे चालू असताना प्रभात चित्र मंडळाच्या दैनंदिन कार्यक्रमावर देखील नांदगावकरांचे बारीक लक्ष असायचे.

              मलाही सुधीरभाऊंनी लेखनासाठी प्रोत्साहित केले होते. मुंबई आकाशवाणीवर चित्रपटगप्पा या शीर्षकाखाली लिहिलेला एक लेख प्रसारित झाला होता. तो त्यांनी आवर्जून वास्तव रुपवाणीया प्रभातच्या नियतकालिकात प्रकाशित केला. शिवाय मला पत्र पाठवून भेटायला बोलावले. ‘ तू चांगले लिहिले आहेस. या लिहिण्यात सातत्य ठेव….’असे त्यानी आवर्जून सांगितले होते. ही व्यक्ती मी प्रभातचा सदस्य झाल्यापासून माझ्या परिचित होती

              दादरचे ऑफिस, मिनी चित्रा, मिनी ब्रॉडवे, ताराबाई हॉल, चव्हाण सेंटर, या सर्वच ठिकाणी नांदगावकर जातीने हजर असायचे वेळोवेळी कार्यक्रमाचे संयोजन करायचे. प्रभातमध्ये त्यांनी तरुणवर्गाला चित्रपट चळवळीविषयी प्रबोधन करून जाणते केले आहे. ही व्यक्ती स्वभावाने निगर्वी पण स्पष्टवक्ती होती. त्यांचा चेहरा नेहेमी प्रफुल्लित असायचा. कितीतरी जुने चित्रपट तारे, तारका नांदगावकरांच्या परिचयातील होते. काहींच्या दिलखुलास मुलाखती वर्तमानपत्रात तसेच सिने नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या आहेत.

सुधीर नांदगावकर यांच्या जाण्याने सिने सोसायटी चळवळीचे मोठे नुकसान झालेय. पण अंत:प्रेरणेने कार्य करणाऱ्या सुधीर नांदगावकरांनी उभारलेली ही चित्रपट रसिकांची चळवळ रसिकांनीच पुढे न्यायला हवीय. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

                                                       :::::::::::::::::::::::

 

 

No comments:

Post a Comment