Saturday, 4 June 2022

💐💐निसर्गायण💐💐

            जून महिना उजाडला, तरी वातावरणातील उष्णतेच्या झळा काही कमी झालेल्या नाहीत. हा उन्हाळा साऱ्यांना बेजार करीत आहे. अवघ्या जीवसृष्टीलाच तीव्र उन्हाळ्याची झळ बसते आहे.    

                 मात्र उष्णतेचा हा कोप नैसर्गिक नाही, हा मानव निर्मित आहे. बेसुमार जंगलतोड आणि निसर्ग संवर्धनाकडे होत असलेले दुर्लक्ष, यांमुळे हे घडत आहे.

                वास्तविक, वातावरणाचे आरोग्य निरोगी राहाण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हायला हवीय. डोंगर, दऱ्या, नदी, नाले, यांचे अस्तित्व कायम राहण्यासाठीही हे जरुरीचे आहे. पाऊस, पीक आणि पाणी हे निसर्गाचे  अनमोल देणे अखंडीत ठेवण्याची जबाबदारी पृथ्वीवर राहाणाऱ्या, वावरणाऱ्या प्रत्येकाची आहे. निसर्गाचे संवर्धन आपण कर्तव्यबुद्दीने जागरूक राहून केले, तरच या पृथ्वीवर आपण सुरक्षित राहू शकू. अन्यथा आपला अनर्थ अटळ आहे.  

                या उष्ण वातावरणाची सांगता करायला पर्जन्य देवतेने पृथ्वीवर लवकरात लवकर यावे, याची मी प्रतिक्षा करीत आहे. पण ही प्रतिक्षा करीत असताना माझे मन चिंब चिंब भिजलेल्या पर्जन्यमयी भूतकाळात चालले आहे……….… 

💐येरे येरे पावसा, आता तरी येना💐

              पर्जन्यराजा जेव्हा प्रसन्न होऊन बरसू लागतो, तेव्हाचे काही स्मरणीय क्षण आणि घटना मला याक्षणी आठवत आहेत

             भीमाशंकरची भटकंती करून परतताना कर्जतच्या वाटेवर पावसाने आम्हाला गाठले. त्यावेळी जोरदार वारा आणि पावसाचे टपोरे थेंब झेलीत, वजनदार पाठपिशव्या सांभाळत खाली उतरताना मज्जाही येत होती, अन थरारही अनुभवत होतो !                  

            माळशेज घाटातील भन्नाट पावसाचा अनुभव थोडा वेगळा आहे….

             निसर्गप्रेमी दोस्त मंडळींसह घाटात कितीतरी वेळा भ्रमण झालेय. पण पावसाळ्यातील माळशेज घाटाचे भ्रमण काहीसे विशेष असते. या विस्तिर्ण घाटात अगदी समोर दिसणारे कापसाळी ढग त्यामागचे निळेशार आभाळ न्याहाळताना खाली दिसणारी खोलखोल दरी बघून धडकी भरते, तर दूर हिरव्यागार डोंगररांगांतून कोसळणारे शुभ्रधवल धबधबे पाहाताना मती गुंग होते !

             एकदा या घाटाच्या माथ्यावर धोधो पावसात सकाळच्या प्रहरी एका सरकारी शेडच्या बाहेर खुर्चीत एकटाच निवांत बसलो होतो. भिजता आसरा घेण्याची ती परिस्थिती होती. मी पूर्ण भिजलो होतो, तरी खुर्चीतुन उठावेसे वाटेना !  मी तसाच बसून आसमंत न्याहाळू लागलो. पश्चिमेला काही अंतरावर भयाण दरी, त्यापलीकडे दूरवर दिसणारी हिरवीगार डोंगररांग मला रम्य भासत होती. आभाळातून पाऊसथेंब रिमझिम बरसत होते. ते मला झोडपत नव्हते, अलगद बिलगत होते ! समोरच्या हिरव्या डोंगररांगा मध्येच येणाऱ्या सुर्यकिरणांमुळे सुवर्णमयी दिसु लागल्या ! किती सुंदर अनुभव आहे हा !

                  नाशिक सिन्नर भागात पट्टाकिल्ला प्रसिद्द आहे. मात्र तेथे जायला कंटाळा येतो ! कारण खूप पायपीट करावी लागते. अर्थात, पावसाळ्यात ही भ्रमंती भन्नाट वाटते. फक्त भिजण्याची भरपूर चालण्याची सवय हवी.  

                  पाऊस कोसळत असताना पट्टाचढायला आम्ही सुरुवात केली. खट्याळ टवाळकी करीत अंतर्बाह्य चिंब होऊन पट्ट्याचा माथा कसाबसा गाठला. या किल्ल्यावर फिरताना ढग आणि धुके आपली वाट अडवतात खरे, पण तीच खरी धम्माल आहे !

                  गेल्या वर्षीच्या मे महिन्यात दोन दिवस सतत कोसळणाऱ्या कोकणातल्या पाऊससरींचा अनुभव देखील असाच धम्माल आहे ! त्या संध्याकाळी अचानक सुरू झालेला मोसमातील पहिला पाऊस होता. मी त्या पावसात भिजण्याची संधी सोडली नाही. लगेच गच्चीवर जाऊन मनसोक्त भिजू लागलो ! मे महिन्याचा उष्मा या पावसाने क्षणात घालवून टाकला !              

                  मात्र मी अनुभवलेले हे पर्जन्यमयी दिवस आता भूतकाळात गेलेत. आता फक्त आठवणी राहिल्यात. म्हणून हा तीव्र उन्हाळा शीतल करण्यासाठी मी पर्जन्य देवतेला विनवणी करीत आहे…….…

               येरे येरे पावसा आता तरी येना,

               चिंब चिंब भिजव बघू तुझ्या लेकरांना

               तेव्हा कसा बरसलास धबधब्यावाणी,

               आता मात्र तुझा थेंब टिपूसभर नाही !

               नको नको नारे असा रुसून फुगून राहू,

               झाले गेले सारे आता विसरून जाऊ

               आम्ही घेतो शपथ आता रोपे झाडे लावू,

               न्हाऊ माखू घालीत त्यांना खत-खाऊ देऊ

               झाडे मोठ्ठी झाल्यावर खूप मज्जा येईल,

               चिऊ, काऊ, खारुताईंची धम्माल होईल

               हिरवे हिरवे गालिचे मग हलू डूलु लागतील

               डोंगर, दऱ्या, नदी, नाले सण साजरा करतील

              म्हणून म्हणतोय पावसा आता तरी येना………..

 

                                                               ……………....

 

 

                     

 

No comments:

Post a Comment