Friday, 1 January 2021

💐💐मित्रांगण💐💐

 💐💐मित्रांगण💐💐

             माझ्या मित्रांगणात काहीजण भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत, तर काही मित्र यशस्वीपणे देशसेवा करून निवृत्त झाले आहेत. आपल्या भारत देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांसह मी माझ्या या सैनिक मित्रांना यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी त्रिवार सलाम करीत आहे.     

             माझा एक तरुण मित्र  हवाई दलात चेन्नई येथे मोठा अधिकारी म्हणून देशसेवा करीत आहे. मी ठरवले की, त्याच्याशी देशसेवेबद्दल आणि इतर सर्वसाधारण विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारायच्या. त्याप्रमाणे मी माझ्या    मित्रासमवेत काही गप्पागोष्टी केल्यात.

             या गप्पागोष्टींचा सारांश मी तुमच्यापुढे सादर करीत आहे :-

💐सुसंवादवायुसेना जवानाशी💐


 
*तुझा आवडता छंद कोणता ?

--टिव्हीवरील न्यूज पाहाणे(राजनीती, व्यापार, परराष्ट्र व्यवहार, सैन्यासंदर्भातील). मला बुद्दीबळ खेळणे   पोहणे आवडते. मी पुस्तकंही वाचतो, विशेषतः स्टोरीज आणि थ्रिलर्स. ऐतिहासिक पुस्तकांचे वाचनपण केले आहे(राधेय, कौंतेय, स्वामी, मृत्युंजय, वि. दा. सावरकर, इंडिपेंडन्स वॉर फ्रीडम फायटर्स, इत्यादी). तसेच फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे आत्मकथनपर पुस्तक मी वाचलेय.

*तू  भारतीय हवाई दलात जाण्याअगोदर पूर्ण केलेले आणि आताचे शिक्षण याची माहिती देशील  ?

--तेव्हा बारावी उत्तीर्ण होतो. आता मी ग्रॅज्युएट(बी.कॉम) आहे.

*घरच्या माणसांचा सपोर्ट तुला कसा होता ?

--हो, सुरुवातीपासून भरपुर सपोर्ट होता. देश सेवेमुळे घरच्यांची प्रत्यक्ष भेट वर्षातून एक दोनदा व्हायची. आताही तसेच आहे. मोठया भावाने घरच्यांकडे, आईवडिलांकडे लक्ष दिल्याने मला विना दबाव देशसेवा करता आलीय.

*रुजू होताना कुठले पद होते ? आता तूला कोणते पद आहे ? सुरुवातीचे प्रशिक्षण कालावधी कसा होता ?

--नियुक्तीच्या वेळी मी हवाई सैनिक(Airman) होतो. आता वॉरंट ऑफिसर पदी आहे. या सेवेमध्ये प्रशिक्षण कालावधी हा साधारणतः एक दोन वर्षे असतो. मात्र कार्यानुसार हा कालावधी वेगवेगळा असतो. दलातील सेवेसाठी आवश्यकतेनुसार टेक्निशियन, एक्सजेक्युटिव्ह/प्रशासक तयार केले जातात.

             तसेच, नैसर्गिक आपत्ती जेव्हा राज्य प्रशासनाच्या हाताबाहेर जाते, त्यावेळी  सुरक्षा व्यवस्थेसाठी डिफेन्सला बोलावतात. पण सैन्याने कधी सिव्हिल प्रशासनाला मदतीस  बोलावल्याचे तुम्ही ऐकलंय का ? सैन्यदल नेहेमी स्वयंपूर्ण राहाते. जणू एक अख्खं विश्वच असतं इथं !

*सैन्यदलामध्ये तुला  का जावेसे वाटले ? आणि, हवाई दलातच का प्रवेश घ्यावासा वाटला ?

--यापेक्षा निर्भय/निर्भेळ देशसेवेचा मार्ग माझ्या दृष्टीपथात आलाच नाही.

*प्रमोशन कितीवेळा मिळालेय तुला ?

--पाच वेळा प्रमोशन्स मिळाली आहेत मला. थोडे कठीण आहे ते. मात्र तुमचा दृष्टीकोन आणि मेहेनत तुम्हाला लवकर प्रमोशन मिळवून देऊ शकते.

* तू किती राज्ये पाहिलीस आतापर्यंत ?

--नऊ राज्ये पाहिली आहेत.

*किती सीमांवर सेवा बजावली आहेस ?

--सहा राष्ट्रीय सीमा. दोन सीमांवर दोनदोन वेळा सेवा बजावलीय मी.

*हिमालयाच्या सानिध्यात कधी सेवा बजावलीस ?

--होय, अगदी एलओसीपर्यंत. ‘एलएसीपर्यंतही मी सेवा बजावलीय.

*तुझ्या देशसेवेतले कसोटीचे क्षण कोणते ते सांगशील ?

--‘’एलओसी’’वर दोन वर्षे आणि ‘’एलएसी’’वर  दिड महिना, अशा प्रत्यक्ष सेवा केल्यात. कारगिल, अंजार येथील भूकंप त्सुनामी आपत्ती दरम्यान अप्रत्यक्ष सेवा केली आहे. हे अनुभव मला उपयोगी ठरलेत.

*दूर फिल्डवर असताना आपल्या कुटुंबाची आठवण आल्यावर तुझी मानसिक स्थिती कशी असते ?

--फॅमिली लाईफ बऱ्याचदा सुरळीत ठेवणे कठीण होते. पार्टनर्स, फॅमिलीला बऱ्याच गोष्टी आपल्यावीना स्वतः हाताळाव्या लागतात.  कुटुंबापासून दूर असताना आठवण येतेच. पण कर्तव्याचे श्रेष्ठत्व त्या मरगळीवर बलवत्तर ठरते. खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते, कारण आमची कुठेही एक दोन महिन्यासाठी डिप्लोयमेंट होत असते. मात्र, फिल्डवर इतर गोष्टींचा विचार करायला वेळ क्वचित मिळतो. शिवाय, संचार उपकरणांवरही कित्येकदा बंदी असते.

*२६ जानेवारी १५ ऑगस्ट या विशेषदिवशी कसा रुटीन असतो ?

--या दोन्ही दिवशी परेडनंतर ध्वजारोहण ध्वजवंदनाचे कार्यक्रम साजरे होतात. परेड राष्ट्रीय पातळीवर दिल्लीमध्ये होते, हवाई प्रात्यक्षिके होतात. एअर फोर्स स्टेशनमध्ये ध्वजारोहण ध्वजवंदनाचा कार्यक्रम साजरा होतो.  दुपारी लंच सेलिब्रेशन(बडा खाना) जल्लोषात होते.

*फिल्डवर असताना कामाचा ताण हलका करण्याचा उपाय कोणता असतो ?

--फिल्डवरदेखील खेळ खेळले जातात. मॅगेजिन्सचे वाचन होते. सिनेमे पहायचीही सोय असते. कोणी गाणी म्हणतात, तर कोणी वाद्ये वाजवतात.

*कितीतरी शस्त्रे-गन्स-मिसाईल्सची ओळख झाली असेल तुला. ती  हाताळलीही असतील तू. मग त्यापैकी कोणते शस्त्र, सामुग्री आवडते जास्त प्रभावी वाटते तुला ?

--ग्लॉक पिस्तुल आणि लाईट मशीनगन.

*युध्द काळ सोडला तर इतर वेळी सुट्टी सहज मिळते का ? त्यासाठी अगोदर परवानगी आवश्यक असते का ?

--सुट्टीसाठी आधी परवानगी घ्यावी लागते. सुट्टी मिळणे हे टास्कवर अवलंबून असते. साठ तीस दिवसांची सुट्टी असते. पण प्रत्येक वेळी सुट्टी मिळतेच असे नाही. तरीही आपल्या आवश्यकतेनुसार सुट्टी मिळते.

*तुला नवीन तरुणांना काय सांगावेसे वाटते ?

--आपल्या सैन्यदलात सिव्हीलिअन्सना कॉम्रेडशिप शिकविली जाते. शिस्त अंगी बाणवली जाते. आचरणाचे शिष्टाचार शिकविले जातात. त्यामुळे ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. वाकपटूत्व अंगी येते. म्हणूनच डिफेन्स पर्सनची सिव्हिलिअन्समध्ये एक वेगळी ओळख असते. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी होते, टीम स्पिरीट अंगी येते, या साऱ्यामुळे आपली हिम्मत वाढते. टीम स्पिरीटसुद्दा अंगी येते.

*सिव्हीलियन्स मध्ये तुला कोण जवळचे आणि आपलेसेवाटतात ?

--शास्त्रज्ञ, शेतकरी, समाजसेवक, कलावंत, मजूर-श्रमिक, आणि तरुण वर्ग. हे सर्व घटक सुदृढ समाज उभारणीस कारणीभूत होऊ शकतात. शिवाय आपला परिवार मित्रगण हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. हे सारेच आपले वाटतात.

*याशिवाय तुला अजून काही सांगावेसे वाटतेय का ?

--होय, सांगायचे आहे--युवकांनी जरूर आर्म फोर्सेस जॉईन करावे. टाईम, फायनान्स, इमर्जन्सीज, यांचे मॅनेजमेंट स्किल त्यांना कोठेही शिकता येईल. मात्र ते आत्मसात करणे फक्त आर्म फोर्सेस मध्येच होऊ शकते. म्हणून तरुणांनी सैन्यात अवश्य दाखल व्हावे आणि चांगल्या संधीचा लाभ घेऊन देशसेवा करावी..

 

                               सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

                                                               || जय हिंद ||

 

                                      :::::::::::::::::::::::::::::

 

No comments:

Post a Comment