Wednesday, 1 July 2020

💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐

                    माझ्या आयुष्यातल्या आषाढ वाऱ्या दोन आहेत. एक पंढरीच्या श्रीविठुरायाची वारी, तर दुसरी आहे गिरीमित्र संमेलनाची वारी ! यापैकी पंढरीची वारी इच्छा असूनही मी अजून केलेली नाही. त्यामुळे ती अनुभवलेलीसुद्दा नाही.

                   आपल्या महाराष्ट्रात डोंगरवेड्या गिरीमित्रांची संमेलनवारी दरवर्षी याच काळात भरते. मुलुंड या मुंबईतील उपनगरामध्ये अवघे गिर्यारोहक आणि गिरिप्रेमी उत्साहाने जमतात. हाऊसफुल्ल वातावरणात ही वारी रंगते. यंदा मात्र ही संमेलन वारी होण्याची शक्यता नाही !

                   या दोन वारींविना तळमळणारे माझे अंतर्मन जनांस काही आठवणी सांगू इच्छितेय…………………

 

💐लॉकडाऊन आषाढ वारी

                  पंढरीचा  श्रीविठुराया हे माझे आवडते  दैवत. लाखो वारकऱ्यांना वेड्यागत संमोहित करणारा श्रीविठुराया मला कायम ओढत राहिला आहे पंढरीला एकदा तरी ये म्हणून !. त्यामुळे ठरवले, की घेऊया आपण श्रीविठुरायाची भेट. पाहूया  श्रीक्षेत्र  पंढरपूर.  पण ते अजून घडले नाही,  या ना त्या कारणांमुळे !

                  निदान वर्षातून एकदा तरी पंढरपुरला जाणारी वारी पाहावी इथे मुंबईत राहून ‘. असे ठरवून दरवर्षी आषाढी एकादशीला मुंबईत वडाळ्याच्या  श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात  मित्रासमवेत जाऊ लागलो. यात श्रद्देपेक्षा वडाळ्याच्या  जत्रेत फिरण्याची हौस जास्त होती. आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री सर्व वडाळा परिसर जत्रेतील गर्दीने फुलून गेलेला असे.

                    मुंबईतील कितीतरी वाऱ्या टाळ-मृदंग आणि अभंगाच्या गजरात  तेथे दाखल होतात ते आपण पाहावे आणि जत्रेतील भटकंतीचा आनंदही लुटावा, या दोन इच्छा दरवर्षी पूर्ण होत होत्या. मात्र  भल्या मोठया रांगेत सहसा उभा राहिलो नाही, की आत जाऊन मूर्तीच्या पायी डोके ठेवले नाही. देवळाबाहेरील गर्दीत डोळे मिटून नमस्कार करून मी धन्य होत होतो. त्यात मला आनंद मिळायचा.

                    नोकरीला लागल्यानंतर वडाळ्याला जाणे कमी कमी झाले. उपनगरात कुटुंबासह राहायला आल्यावर तर वडाळ्याची आषाढ वारी दूर झालीय ! क्वचित कधी त्या भागात गेलो, की आठवणीने मंदिरात जाऊन नमस्कार व्हायचा श्रीविठुरायाला अन रुक्मिणी माऊलीला. वारीकाळात गजबजून गेलेले तेथल्या मंदिराचे प्रांगण आता मात्र शांत असायचे.

                    

                   अलीकडे पाच सहा वर्षांपासून दैनिक वृत्तपत्रात किंवा टीव्ही-रेडिओवर आषाढ महिन्यात येणारी वारीची वृत्ते मनाला अस्वस्थ करू लागली. ‘ का नाही आपण पंढरीच्या वारीला जात ? काय कठीण आहे त्यात ? एवढी माणसं जातात कशी ? आपण तर पायी भटकण्यात स्वतःला  माहीर समजतो ना ? ‘ असे मनी आले आणि मग ठरवले की जाऊ या आपण पंढरीच्या वारीला. 

                   त्यानंतर वारीची माहिती घ्यायला लागलो. ही वारी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून मोठ्या समारंभाने निघते, ती कधी निघते ? कुठून निघते ?  एवढा मोठा वारकऱ्यांचा समूह आहे, त्यांचे मंडळही असावे ? वडाळा येथील भक्त मंडळी वेगळी वारी नेतात ?, अशी काही माहिती हाती लागली.

                   वडाळा मंदिरातील प्रमुख पुजाऱ्यांना भेटलो. ते म्हणाले- ‘ हो जाते की दरवर्षी पंढरीची वारी. पण ती प्रत्यक्ष पुण्याहून सुरू होते. इथून सारे मिळून एक बस ठरवतात. पुण्यात बस पोहोचली की मोठ्या वारीत मंडळ सहभागी होते. तुमचे नाव नोंदवायला पुढील वर्षी याच महिन्यात सुरुवातीला या की…….’ 

                   दुसऱ्या  एका मंडळाची माहिती मिळाली. सायन सर्कल जवळचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. मंदिराचे  पुजारी म्हणाले- ‘ आमच्या देवळात एक वारी येते दरवर्षी. ते वारकरी नेमके कुठून येतात ते माहीत नाही बुवा !....... ‘  त्यानंतर मी या वारी मंडळींचा शोध थांबवला.

                   आता मी वारीविषयी काही वाचनीय साहित्य मिळवीत आहे. माझ्याकडे  एक वारी विशेषांकही आहे. हे वाचन मला प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचे अनुभव देत आहे. पुणे आकाशवाणी केंद्र वारी काळात लाईव्ह प्रक्षेपण ऐकवीत आलेय. तोही एक वेगळा आनंद  मी घेतलाय.

                   ही पंढरीची आषाढवारी  प्रत्यक्ष अनुभवण्याकरीता आजदेखील मी अधीर उत्सुक आहे.

 

💐गिरीमित्रांची संमेलनवारी💐

             डोंगर-दुर्गांवर भटकंतीचे वेड लागलेला मी एक मनस्वी गिर्यारोहक आहे. माझ्यासारख्या भटक्या वल्ली सर्वदूर पसरल्यात. आपले शिक्षण-नोकरी, व्यवसाय, तसेच आपला घरसंसार सांभाळून  महाराष्ट्रात  दरवर्षी नेमाने जुलै महिन्यात, म्हणजेच आषाढात गिरिप्रेमी वारकरी दूरवरून श्रद्देने एकत्र  जमतात. या  गिरीमित्रांची संमेलनवारी मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरी होते.

                  हाऊसफुल्ल गर्दीत संपन्न होणाऱ्या या वारीचे यंदा १९ वे वर्ष आहे.

                 या लॉकडाऊनच्या वातावरणात ही संमेलन वारी यंदा होण्याची शक्यता नसल्याने मनी अस्वस्थता आलीय. फक्त मीच नव्हे, तर समस्त डोंगरवेडे गिरिप्रेमीसुद्दा  अस्वस्थ आहेत.

                 मात्र या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातील वेबिनार, ग्रुप चर्चा आणि संवाद कार्यक्रम आयोजित करून एकमेकांशी संपर्कात राहाण्याचे प्रयत्न करीत ऑनलाईन संमेलन वारीचा आनंद हे डोंगरवेडे  घेत आहेत.                             

                या संमेलन वारीतील मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. लॉकडाऊन काळात मला मागची कितीतरी संमेलने आठवू लागली, की माझ्या मनीचे  नैराश्य जाऊन उत्साह येत आहे.  

                   अठरा वर्षे सुरू असलेली आमची वारी  साऱ्या राज्यात प्रसिध्द आहे.

                   या  वार्षिक संमेलनवारीच्या आयोजनाची पूर्वतयारी एक-दोन महिने अगोदर नव्हे, तर पाच सहा महिन्यांपासून सुरू होते. फोन आणि वॉट्सअप, अशा माध्यमांतून जुन्या नव्या कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क सुरू  होतो.

                   मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये कार्यकर्ते एकत्र जमतात. त्यांच्या प्रत्यक्ष मिटींग्ज होतात. मुंबई नगर-उपनगरातील हरहुन्नरी  तरुण मंडळी आपली कामे, अभ्यास, इत्यादी सांभाळून वेळ काढतात  मुलुंडला येतात. मिटिंगमध्ये होणाऱ्या चर्चा-संवादात उत्साहाने भाग घेतात, ही मिटिंग संपून आपल्याला घरी परतायला किती  उशीर होईल याचे भानही या दर्दी वारकऱ्यांना राहात नाही. महाराष्ट्र सेवा संघाचे पदाधिकारी तसेच तत्पर सेवक वर्गाचा  भक्कम आधार गिरीमित्रांची आजवरची संमेलने यशस्वी करताना प्रारंभीपासून मिळत आहे.

                   महामारीच्या या कठीण परिस्थितीमध्ये  गिरीमित्र  संमेलन यंदा प्रत्यक्ष होण्याची शक्यता वाटत नाही  याची रुखरुख माझ्यासह कित्येक डोंगरवेड्या वारकऱ्यांना वाटते आहे.

            परंतु, लवकरच ही परिस्थिती सुरळीत होईल. सर्वत्र निर्मळ-निरोगी वातावरण तयार होईल. त्यानंतर आमची न झालेली संमेलनवारी मोठ्या जल्लोषात संपन्न होईल, हा विश्वास माझ्या मनी असल्याने, “ ही गिरीमित्र संमेलनवारी लवकरच प्रत्यक्षात घडु दे “,  अशी मी पंढरीच्या श्रीविठुराया चरणी || प्रार्थना || करीत आहे.  

 

         

                                                                   ::::::::::::::::::::::::::       

 

 

1 comment: