Wednesday, 1 July 2020

💐मित्रांगण💐

💐मित्रांगण💐

               या  महिन्यात पाच जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या शुभ दिनी मी  माझ्या एका खास मित्रास, जो मला गुरुस्थानी आहे, त्यास त्रिवार वंदन करीत आहे.

               मला या मित्राने गुरू म्हणून  नेमके काय ज्ञान  दिलेय ? कोणता सन्मार्ग दाखवलाय ? आणि मी त्यास का वंदन करावे ?, याविषयी हा थोडासा संवाद तुमच्याशी……………..

 💐मित्र, सन्मित्र की गुरू ?

            माध्यमिक शाळेत आमचा परिचय झाला नंतर आम्ही जवळचे मित्र बनलो. हा सवंगडी खूप कष्टाळू, जिद्दी आणि अभ्यासू  होता.  प्रतिकूल परिस्थितीत त्याने  आयुष्याची वाटचाल सुरू  केली, आणि आज स्वबळावर हा मित्र कुटुंबासह आयुष्यात चांगला  स्थिरस्थावर झालाय.

                 स्वतःचे शिक्षण घेताना आर.एस.एस. या राष्ट्रव्यापी संघटनेत दाखल होऊन तो सक्रिय राहिला. त्याला धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ वाचनाची आवड  होती.  दासबोध, भगवद गीता आणि श्रीज्ञानेश्वरी यांविषयी तो माझ्याशी  भरभरून बोलायचा.

                 शालेय शिक्षण संपल्यावर कॉलेजला आम्ही दोघेही जायला लागलो. मात्र परिस्थिती मित्राला अनुकूल नव्हती. पोटासाठी  नोकरी आवश्यक असल्याने कॉलेज शिक्षण त्याने स्वतःहून थांबवले. सरकारी नोकरीत तो स्थिर झाला. पुढे त्याने कॉलेज शिक्षण नाही घेतले. मात्र धार्मिक अभ्यासाची त्याची ओढ कायम राहिली.

                सूर्योपासना गायत्री मंत्र  यांचा तो बारकाईने अभ्यास करू लागला. घरातील  नेहेमीचे धार्मिक विधी-पूजा, उपासना, आराधना, जप-तप याबाबत बरीच माहिती त्याला होती. या मित्राला गूढ विद्याही अवगत झाली होती. मी त्याच्या सहवासात जास्त काळ राहिल्याने काही विलक्षण निरीक्षण मला अनुभवायला मिळाले.

                 आपली नोकरी सांभाळीत या क्षेत्रातल्या जवळपास दहा हून अधिक अनुभवी व्यक्तींशी संपर्क ठेऊन तो ज्ञान मिळवीत राहीला. गूढ विद्या देणाऱ्या सगळ्यांना तो आपले गुरू मानायचा !  आपण मिळविलेले  हे  धार्मिक क्षेत्रातले ज्ञान बहुमोल आहे. त्यातले किमान  प्राथमिक ज्ञान  इतरांना मिळायला हवे ज्याचा त्यांना आयुष्यात चांगला उपयोग करता होईल, ’  असे त्याचे म्हणणे होते.

                संघाच्या एका मान्यवर वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे या मित्राने या विषयी सल्ला मागितला.त्यांना तात्या म्हणत असू आम्ही. खरेतर, तात्याच त्याचे आध्यगुरू होते !  रेल्वेतून रिटायर्ड झालेली ही व्यक्ती खूप ज्ञानी अन शिस्तबद्द होती. तात्यांचा विशेष जीव होता माझ्या मित्रावर. त्यांनी योगी चांगदेवांवर एक पुस्तक देखील लिहिले आहे. ते स्वभावाने मोकळे, पण स्पष्टवक्ते होते. 

                प्रसंगी त्यांनी  मित्राच्या बऱ्याच चुका दाखवून त्याची बोलती बंद केली आहे. आज तात्या हयात नाहीत. त्या दोघांचे  झालेले बरेच वाद माझ्या समोर झालेत, म्हणून हे विस्ताराने सांगत आहे.

              सर्वाना शक्ती आणि बळ देणारा गायत्री मंत्र आहे. तू  त्याचा नीट अभ्यास कर, या मंत्राची सध्याच्या काळात लोकांना बळ मिळण्याकरीता खूप जरुरी आहे. हे त्यांना पटवून दे. हे तुझे एकट्याचे काम नव्हे, समूहाचे काम आहे ‘, असे तात्यांनी एकदा मित्रास सांगितले.

                मग  गायत्री परिवाराची संकल्पना  मित्राने परिचितांपुढे मांडली. त्या नंतर, ‘गायत्री परिवारनिर्मिती झाली. गायत्री  मंत्राचे योग्य शब्दोच्चार-अर्थ-नियम, इतर मंत्र जप, होमहवन-यज्ञ, आहुती, इत्यादी विषयीची माहिती  हा  मित्र आपल्या साधकांना देऊ लागला. निसर्ग रम्य ठिकाणी अभ्यास शिबिरे आयोजित होऊ लागली. गायत्री परिवार वाढत राहीला. साधक ज्ञान घेऊ लागले. आज हा गायत्री परिवार मोठा झालाय. मी मात्र  या परिवारापासून माझ्या व्यापांमुळे त्यात सक्रीय राहिलेलो  नाही.

               माझी देवावर असलेली श्रद्धा या मित्रामुळे वाढलीय खरी, पण ती आंधळी झालेली  नाही. संकट-आपत्तीमध्ये  आपण भावनावश होता आत्मविश्वासाने पुढे कसे जावे, याचे धडे मला या मित्राने दिले आहेत. एकाकी अवस्थेत असताना मला वेळोवेळी सावरले देखील आहे.

               या  परममित्राचे शिष्यत्व मी स्वीकारले  असले, तरी प्रसंगी  पटणाऱ्या विषयांवर त्याचेशी वादसुद्दा घातलेले आहेत. महत्वाचे म्हणजे, या गुरूकडून मी घेतलेल्या ज्ञानातील मला योग्यवाटणारे ज्ञानच मी आत्मसात करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी केले आहेत.

               अशा या गुरूरुपी सन्मित्रास माझे || त्रिवार वंदन || आहे.

 

                                                                    :::::::::::::::::::::::::::::::

 

No comments:

Post a Comment