💐कथाघर💐
💐कथाघर💐
‘ मॅन इज अ सोशल ऍनिमल ‘ हे मानसशास्त्राच्या विद्यार्थी वर्गात अधिक परिचित असणारे वाक्य आहे. प्रत्यक्षात आपले समाजमन खरोखर इतके सोशल आहे का ?
आपल्या समाजात कुटुंबासह किंवा कुटुंबाशिवाय वावरताना अचानक दंगलीसारखी आपत्ती घडली, की आपला समोरच्यावरचा विश्वास उडून जातो. ‘आपण’ आणि ‘ते’, ‘ ते ‘ आणि आपण, यात मोठी दरी निर्माण होऊ लागते. सगळा विस्कोटा होऊ लागतो. हे सगळे भयाण आहे. या परिस्थितीत ‘ते-त्यांचे’, ‘आपण-आपले’ हेच माणसाच्या डोक्यात भिनू लागते, मग समाजकलह सुरू होतो.
आज आपण येथे वाचणार आहात, त्या कथेमध्ये दोन समाजामधल्या दंगलीचे प्रत्यक्ष चित्रण नाही. पण त्यावेळची स्थिती आणि मनस्थिती एका पांढरपेशी पण संवेदनशील माणसाने स्वतःच्या डायरीत टिपण-माध्यमातून लिहिलेली आहे. ती वाचून आपले मन अस्वस्थ होईल. बरे-वाईट, स्वार्थी, तसेच व्यवहारी विचार करणारी माणसे, त्याचप्रमाणे आपणच किती खरे आहोत यावर शिक्कामोर्तब करून, स्वतःची कातडी वाचवून, सुलभ-सुरक्षित जगण्याचा राजमार्ग स्वीकारणारी माणसे या कथेत आपल्याला भेटणार आहेत……….. …
💐दंगल डायरी💐
गेले चार दिवस एवढा उदास आहे की, काही लिहावेसे वाटत नाही. एकीकडे चीड येतेय. समोर घडणाऱ्या घटना पाहावत नाहीत. मुड गेलाय सगळा.
शनिवारी कळव्याला प्रॅक्टिसला जाऊन आलो. त्या दिवसापासून ते आजपर्यंत मुंबई पेटलीय. या भागातदेखील बरेच काही घडलेय. सद्या रात्री जागरणे करावी लागतात. मनी अस्वस्थता आहे. उदासी आहे. कारण खूप घटना घडल्या आहेत व घडत आहेत. त्यावर लिहावेसे वाटत नाही.
बरोबरीची माणसं, नातेवाईक आणि मित्रमंडळी पेटून उठल्यासारखे बोलतात. द्वेषाचीच कहाणी सांगतात.’ त्यांना असेच मारायला हवेय. हाकलून लावायला हवेय. ही माणसं विश्वास घातकी आहेत. आपल्या लोकांना यांनी जिवंत जाळलेय. असले लोक इथं नकोत ‘, ही वाक्यं चौफेर ऐकायला मिळताहेत.
नाक्यावर एरियातला एकमेव स्टोव्हवाला आहे. त्याचे दुकान रविवारी साफ करून टाकलेले पाहिले. दोन दुकाने फोडलेली पाह्यली. जळलेली वाहने, रॉबर्ट गोम्स चौक, सोमण नगरच्या अलीकडची मुत्री आणि इतर ठिकाणेही पाहिलीत. एका चौकातील कोपऱ्यावरचा मोठा विक्रेता पार लुटला गेलाय. फोटो फ्रेम्सची दोनतीन छोटी दुकानं साफ उध्वस्त झालीत.
कामावर जाण्यासारखी परिस्थिती मंगळवारपर्यंत नव्हती. संचारबंदी रविवारपासून बेमुदत होती. सकाळी फक्त थोडी शिथिल व्हायची.परवा बारानंतर संचारबंदी चालू झाली. काल आणि आज रात्री आठनंतर आहे. कधी नव्हे, तो रात्रभर चाळीतल्या पोरांत बसून जागरण करतोय. त्यांच्या गोष्टी अजिबात पटत नाहीत. फक्त त्यांना हो हो करतो. उदाहरणादाखल जाळपोळीच्या ऐकले-पाहिलेल्या घटना त्यांना सांगतो.
स्वतःची लाज वाटते. काही पटत नसले तरी त्यांच्यात सहभागी व्हावे लागतेय. कारण, वेगळा राहिलो तर पुचाट, षंढ, आणि स्वार्थीपणाचा शिक्का बसेल !
रविवारी रात्री नाक्यावरच्या वखारीला कोणीतरी पेट्रोल बॉम्बची बाटली फेकून आग लावली. त्यावेळी सगळी माणसं केवढ्या त्वेषाने- अगदी समोरचा वाणी, बायका, इत्यादी लोकं हातात कसली कसली हत्यारं घेऊन नाक्यापर्यंत चाल करून गेले ते प्रत्यक्ष पाहात होतो ! अजूनही डोळ्यापुढून ते दृश्य हलत नाही. हातात एकही शस्त्र घेणार नाही या दंग्यात, असा निश्चय केलाय. पण स्वतःचे संरक्षण करताना प्रतिकार करावा लागेल, तेव्हा गप्प राहाता येणार नाही, नाहीतर जीवावर बेतेल.
या भागात जाळपोळ होईल, खून होतील, ही भिती अजूनही आहे. रात्रभर जागताना जेव्हा फाटते. त्यावेळी, ‘ हे व्हायला नको होते. जे झालेय ते फार वाईट झालेय ’, अशी टोचणी मनात सतत टोचत आहे.
सगळ्यांची चर्चा यावरच चाललीय. मात्र त्यांच्या बोलण्यातली सुडाची भाषा अस्वस्थ करतेय.
काल यामुळे जास्त उदासी होती. आज दुपारी ऑफिसात पार्टनर्स बरोबर जेवावेसेही वाटेना. पण जेवलो नेहेमीप्रमाणे. आता ऑफिसमध्ये गप्प राहून कामात बुडवून घेतलेय. गप्प राहण्याचा हा प्रकार आजुबाजूच्याना बहुतेक खटकला असेल. ‘ या माणसाला काहीच कसे वाटत नाही भोवताली काय चालतेय ते पाहून ? ’, असे म्हणत असतील हे आपल्या पाठीमागे.
--सोमवार
ऑफिसमध्ये काम करताना मजा येत नाही. आजूबाजूंच्या लोकांचे दंगलीचे विषय संपत नाहीत. आपले कान बंद करता येत नाहीत म्हणून, मात्र ऐकवत नाही ते. दंगलीचीच चर्चा करतात. दुपारी, संध्याकाळी बहुतेकजण येतात. यांच्या रक्तात आता जातीयता भिनलीय.
कडवे राजकीय नेतेही हुशार आहेत. त्यांनी लोकांना चांगलेच खिशात टाकलेय.
--गुरुवार
या आठवड्यात एक पिक्चर पाहायला गेलो होतो. विषय धार्मिक दंगलीचाच. एका गरीब कुटुंबाला आणि त्यातल्या नायकाला कशाकशाला सामोरे जावे लागते, ते दाखवणारी ही फिल्म अस्वस्थ करून गेली. आधीच असलेली अस्वस्थता अधिक वाढली.
मुंबईतील एक गरीब कुटूंबाची होणारी वाताहात या चित्रपटात दाखवली आहे. तरुण नायकाचा बाप रिटायर्ड माणूस आहे. मात्र कुटुंबासाठी तो पुन्हा काम शोधतोय. आई गरीब स्वभावाची आहे. या घरात एक बहीण लग्नाची आहे. एक भाऊ वारलाय. नायक हा गुंड बनू पाहणारा तरुण. त्याचे दोस्तही तसेच आहेत. नायक त्यांच्या साथीने गुंडगिरी करतो. चोरी करतो. पोलिसात रेकॉर्ड असल्याने तेथे त्याला नेहेमी हजेरी लावावी लागते !
हे जे काही आपण करीत आहोत ते गैर आहे. आपण आता यातून बाहेर पडायला हवे, असे त्याला वाटू लागते. तो तसा प्रयत्न सुरू करतो.
याच वस्तीमध्ये नायकाच्या भावाचा एक दोस्त राहतोय. शांत स्वभावाचा आणि सुसंस्कृत असा हा तरुण आहे. आपल्या समाजातल्या मुलींनी आणि तरुणांनी खूप शिकायला पाहिजे, अशी त्याची तळमळ आहे, तसे त्याचे प्रयत्न आहेत. मात्र त्याला यामुळे मार खावा लागतोय !
तरी तो दोस्त नायकाच्या मागे लागून, ’ तु चांगला शिक. आपण खूप मागे राहिलोय शिक्षण नसल्यामुळे… ‘ असे आग्रहाने त्याला सांगतो.
दरम्यान, या चित्रपटात एका प्रसंगात पूर्वी झालेल्या जातीय दंगलीचा संदर्भ असलेला एक लघुपट दाखविण्यात येतो. लघुपटाची निर्मिती आहे दुसऱ्या समाजातील तरुणाची. दंगली का होतात ? पंधरा वीस वर्षे मेहनत घेऊन बनविलेले आपले घर स्वतःच्या डोळ्यादेखत जळून खाक होताना का पाहावे लागतेय ? हे दुःखाने सांगणारा एक दंगलग्रस्त आपण या लघुपटात पाहातो. अस्वस्थ होतो आपण. नायकसुद्दा अस्वस्थ झालाय.
‘ आपल्या लोकांवर कोणी विश्वासच ठेवत नाहीत ? परके समजतात आपल्या लोकांना ? नोकरीवर ठेवायला टाळतात ? शिक्षणाच्या सोयीही नीट उपलब्ध नाहीत ? तसे प्रयत्न केल्यावर संधी मिळत नाही ? ‘
‘ मग कसे आपण मोठे होणार ? आपल्या लोकांना मुळी कोणी देशवासीयच मानत नाहीत ! हे का ? काय आहे आपला गुन्हा ? केवळ आपला धर्म वेगळा म्हणून ? हा आपला पण देश नव्हे का ? ‘
‘ आणि किती गरिबी आहे आमच्या समाजात ? कसे जगतेय एकेक कुटुंब माहित आहे ? का लक्षात घेत नाही इतर लोक व त्यांचा समाज ? ‘ या सगळ्या प्रश्नांनी हा लघुपट नायकाच्या आणि त्याच्या मित्राच्या मनातील अस्वस्थता वाढवत राहातो. ‘
अशा परिस्थितीत वास्तवाचे चटके खात खात नायक पुढे वाटचाल करीत आहे.
पण ?......
पण अवचितपणे, एका प्रसंगात नायक त्याच्या मित्रांसह बेभानपणे नाचत असताना भरगर्दीमध्ये त्याला निर्घृण पद्धतीने जीवे मारले जाते !
‘ ज्या धर्मात आपण जन्माला येतो, तेथे आपल्याला सांगीतले जाते की, ‘तो’ धर्म परका आहे. तो आपल्या विरुद्ध आहे. आणि ‘त्या’ धर्मात सांगीतले जाते की ‘या’ धर्मावर विश्वास ठेवू नका ! ‘
हा एकमेकांबद्दलचा अविश्वास कधी आणि कसा नष्ट होणार ? मुख्य म्हणजे घाणेरडे राजकारणी नेते लोक यात हातभार लावताहेत. जळजळीत भाषणे ठोकतात. त्यामुळे दंगे पेटतात. स्वतः नेतेलोक विशेष सुरक्षा घेऊन आपली कातडी बचावतात आणि नामानिराळे राहतात.
हा चित्रपट आज सर्वत्र दाखवायला हवाय. तो परिणामकारक निश्चित आहे. धर्मवेडे प्रेक्षक मात्र या चित्रपटाला रिमार्क देतील-‘ हा चित्रपट ‘त्यांच्या’ धर्मातल्या माणसाने काढलेला आहे ना. ते त्यांचीच बाजू दाखविणार ’.
काहीजण तर हा पिक्चर चालू देणार नाहीत. याला कारण आहे परस्परांबद्दल असणारा द्वेष आणि अविश्वास.
मात्र आपण यात अस्वस्थ होण्यापलीकडे काही करू शकत नाही. फक्त या दंगलीचा विषय काढून कोणी चवीने बोलायला लागला की भयंकर चीड येते. ताडकन एक-दोन वाक्यं तोंडी येतात. समोरच्याला ते खटकते. मग हा विषय बंद होतो.
काल वाशिंदला माहुलीच्या उत्तर बाजूचा भाग पहायला गेलो होतो. वझिरच्या(सुळका) बेसपर्यंत जाऊन आलो. शेवटचा ७०/८० फूट भाग चढाईला कठीण आहे.
तेथून परतताना वाशिंदमध्ये चहा नाश्त्यासाठी हॉटेल शोधायचे वेळी कुडकरला वाटेतल्या एक चांगल्या हॉटेलात, ते ‘त्यांचे’ आहे, या कारणाने पाऊल ठेववेना ! चीड आली त्यावेळी. भडकून काही बोललो देखील त्याला. मनातून राग आला असेल. पण त्याने मलाच वेड्यात काढलेय ! अशांची मैत्री आता नकोशी वाटते .
--बुधवार
आज कळव्याला क्लाइम्बिंग प्रॅक्टिससाठी सगळे गेलो होतो. तेथे कुडकरने दंगलीचा विषय काढला. मागे वाशिंदला झालेला वादही उकरून काढला. तेव्हा सगळेच तावातावाने बोलू लागले. अंजलीला हे सगळेच खटकतेय. मात्र ती परधर्मीयांना राष्ट्रद्रोही मानते. ‘ आपण गप्प किती वर्षे बसणार आहोत ? देशाची फाळणी झाली, म्हणून हे पाहायला लागतेय. त्यावेळच्या पुढाऱ्यांना स्वतःचे मोठेपण मिरवायचे होते. त्यांना शक्य होते हे फाळणी टाळणे. आपले पूर्वजही त्यावेळी गप्प राहिले. त्यामुळे हे प्रकार आपल्याला आता सहन करावे लागतात. आपण किती म्हणून हे सहन करायचे ? गप्प किती राहायचे ? एका गालावर थप्पड मिळाली, की दुसरा गाल कितीदा पुढे करायचा ? ‘
त्यांचे काही मुद्दे बरोबर आहेत. मात्र त्यावेळी आपल्याला नीटपणे उत्तरं देता आली नाहीत. आपले म्हणणे होते,
की, ‘ परधर्मीयांना एकाच मापातून का मापता तुम्ही ? जे गुन्हेगार आहेत ते कुठलेही असोत, कोणीही असोत, त्यांना धरा ना. शासन यंत्रणा आणि पोलीस बघून घेतील त्यांचे काय करायचे ते ‘.
‘ हे शासन काय करतेय ? ते लाड करतेय ‘त्या ‘ लोकांचे. त्याचा अतिरेक झाला म्हणून हे सुरू झालेय ‘.
मात्र माझे म्हणणे आहे, की आपण द्वेष भावनेने बोलतोय ते बरोबर नाही. आपण जाती दुश्मनीच्या नजरेतुन बघतोय. आपला धर्म किंवा इतरांचा धर्म आपले पोट भरायला मदत करत नाही. त्यासाठी आपल्यालाच धडपड करावी लागते.
वर्षानुवर्षे या देशात कितीतरी जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. जगात एकमेव असा आपला देश आहे, जेथे अडाणी माणसंही आहेत आणि उत्तुंग अशी शिक्षणाची अन यशाची शिखरं गाठणारी दिग्गज मंडळी आहेत. आशिया खंडात भारत देश आपली संस्कृती-परंपरा जपत, आणि विकासाची भरारी मारत एक नंबरच्या स्थानावर येत आहे.
या उलट जगात नेपाळची प्रगती धर्मामुळे कोठपर्यंत झालीय ? आज ते मागेच राहिलेय ना ?
यापूर्वी झालेली देशाची फाळणी धर्मामुळे झालीय. तशीच फाळणी, आज जो धर्माचा मुद्दा निघालाय त्यामुळे पुन्हा होईल. देशाचे आणखीही भाग पडतील. उद्या असेच होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःला राष्ट्रपेमी समजणारे काही लोक धर्माचे नाव घेतात आणि पुढे होतात.
निधर्मी राष्ट्र हा दृष्टिकोन आपल्या देशाला पुर्णतः शक्य होणार नाही. हजारो जाती आहेत इथे. या सर्व जातीधर्माच्या व्यवहाराला सार्वजनिक रूप नकोय. इतरांना त्याचा उपद्रव व्हायला नकोय. त्यांनी घरीच आणि पूजा-प्रार्थना करून आपला धर्म राखावा.
सारेजण हेच सांगताहेत. पण ‘ ते ‘आणि ‘ आम्ही ‘ हा परकेपणा लोकांच्या मनातून जात नाहीये. एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. यामुळेचा सध्याचे अस्थिर वातावरण लवकर ठीक होणार नाही, उलट तेढ वाढतच राहील.
उमेश म्हणाला की,’ आम्ही गप्प का म्हणून राहायचे ? उद्या ‘ ते ‘ आपल्यावर काहीही दगाफटका करू शकतील. तुझ्यावर ती वेळ आलेली नाही. आमच्या इथे येऊन बघ त्यांनी काय केलेय ते. मग बोल.’
यावर काय बोलणार ? परंतु हे बदला घेणे थांबायला हवेय. माघार दोघांनीही घ्यायला हवी. शस्त्रे ज्यांच्याकडे मिळताहेत, त्यांचेवर सक्त कारवाई व्हायला हवी. सरसकट जातधर्म न पाहाता सगळ्या दंगलखोरांना खणून शोधून काढायला हवेय. पहिल्यांदा या राजकारणी लोकांना रोखायला हवेय. मत घेताना ही लोकं हा कोठल्या धर्माचा ? आपला नाहीना ? मग याचे मत आपल्याला नको, असे का नाही ठरवीत ? निवडून येतात व आता वेळ पडल्यावर बाजूला कसे होतात ? त्यांना सुद्दा शिक्षा व्हायला हवी.’
आपली स्पष्ट मतं दोस्तांना पुरती पटली नाहीत, याचे वाईट वाटतेय.
--रविवार
दंगलीचा विषय अजून चर्चिला जातोय. भोवतालचे वातावरण आता बरेच निवळलेय. रात्रीची मात्र कर्फ्यु आहे. दोन दिवस शहरातच कोठेतरी गडबड झाली. दोनजण ठार झाल्याचे पेपरला वाचले. अर्थात, पोलिसांचे म्हणणे की,’ फटाके कोणीतरी लावले आणि दंगलीला सुरुवात झाली !’
अशा वातावरणात नेत्यांची शेरेबाजी सुरूच होती. त्यांच्या चिथावणीखोर जिभांना कोण आवर घालणार ? ही अलीकडची दंगल या चिथावणीमुळेच झाली, असे कालच्या पेपरला(नाव आठवत नाही) हेडिंग होते.
--गुरुवार
आज एका परिचित संस्थेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. वृत्तपत्रात प्रसिद्द न झालेली पत्रे या विषयावर संवादात्मक स्पर्धा आणि एका जाणत्या वक्त्याचे व्याख्यान मित्रांसह जाऊन अटेंड केले.
ते व्याख्याते दंगलीचा संदर्भ घेऊन बोलले—‘जगात जशी ख्रिश्चन आणि इतर धर्मियांची ‘चांगल्या कार्यासाठी’ एकजूट आहे, तसे धार्मिक ऐक्य या देशात व्हायला हवेय. त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘चांगल्या कार्यासाठी’ होऊ शकेल. माझे एक मित्र आहेत, दिल्लीच्या एका धार्मिक कुठल्यातरी संस्थेचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की, तुम्हाला आमच्याबद्दल हे माहिती नाही की, आमचे प्रार्थनास्थळ कोठे असावे, याला आमच्या पवित्र धर्मग्रंथात चांगले मार्गदर्शन केले आहे-जी जागा वादग्रस्त आहे, तेथे अशी पवित्र वास्तू उभारू नये, या एका वाक्यातच सध्याचे या संदर्भातील सगळे धार्मिक वाद कोलमडतात.’
खूप चांगले काही ऐकायला मिळाले तेथे. त्यांच्या भाषणातील सारांश सांगायचा तर- आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्व धर्मांमध्ये शांती, सलोखा आणि ऐक्य या तीन तत्वांना खूप महत्व आहे. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होणे हे सुद्दा तितकेच महत्वाचे आहे.
खरे आहे त्यांचे. मात्र आपल्या पुरते सांगायचे झाले तर, या सगळ्यात आपण किस झाड की पत्ती आहोत. आपल्या सारख्या एकट्या दुकट्याच्या वागण्याचा प्रभाव समाजावर होणे अशक्य आहे. वादग्रस्त विषयांवर आपले आपसात निष्कारण वाद होत राहणार आहेत. प्रत्येकाच्या विचारांचा कोन आहे तसाच राहाणार आहे.
सुदैवाने आता दंगल शमलीय. आपल्या मित्र परिवारात सहा-सात वेगवेगळ्या जातीधर्मातील दोस्त आहेत, ज्यांच्याशी आपला जिव्हाळा आहे, चांगली मैत्री आहे. या मैत्रीमध्ये काही मतभेद असले, तरी आपला मित्र परिवार कधी तुटलेला नाही. तो तुटुही नये, अशी आपली इच्छा आहे.
--शनिवार

Comments
Post a Comment